अनिल अंबाणी: एके काळचे अब्जाधीश आणि आजच्या पुनरागमनाच्या वाटेवर
काही वर्षांपूर्वी अनिल अंबाणी यांचं नाव उद्योगविश्वात मोठ्या आदराने घेतलं जायचं. एकेकाळी ते जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत होते. पण वेळ कधीच एकसारखी राहत नाही. त्यांच्या बिझनेस इम्पायरवर संकटांची मालिका सुरु झाली आणि एकामागोमाग एक कंपन्या कर्जात बुडू लागल्या.
२०२० मध्ये लंडनमधील एका कोर्टामध्ये ते ऑनलाईन हजर राहिले होते. त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी चीनच्या एका कंपनीचे कर्ज वेळेत फेडले नाही. कोर्टात त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते पूर्णपणे कर्जात बुडाले आहेत, एवढंच नव्हे तर त्यांच्या वकिलांच्या फी साठीही पैसे उरले नव्हते. त्यांच्या पत्नीचे दागिने विकून ते न्यायालयीन खर्च भागवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे सगळं त्यांच्या काही चुकीच्या बिझनेस डिसीजनमुळे घडलं असं मानलं जातं. पण आज चित्र थोडं वेगळं आहे. मागच्या वर्षभरात सतत चर्चा होतेय की अनिल अंबाणी पुन्हा उभारी घेत आहेत. त्यांच्या कंपन्यांना नव्या प्रोजेक्ट्स मिळत आहेत, आणि गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढतोय.
भूतानमधील मोठा प्रकल्प
१९ मे २०२५ रोजी रिलायन्स पावरने भूतान सरकारच्या ग्रीन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड (GDL) या कंपनीसोबत ५०० मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट उभारण्याचा करार केला. या प्रकल्पात ५०-५० टक्के भागीदारी असेल आणि एकूण २००० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होईल आणि भविष्यातील अनेक वर्षं रिलायन्स पावर भूतानला वीज विकणार आहे.
याचबरोबर, रिलायन्स पावर भूतानमध्ये ६७० मेगावॅटचा हायड्रो प्रोजेक्टही राबवणार आहे. हे भूतानच्या इतिहासातील सर्वात मोठे खासगी गुंतवणूक प्रकल्पांपैकी एक ठरेल.
जर्मन कंपनीसोबत संरक्षण क्षेत्रातील भागीदारी
रिलायन्स डिफेन्सने जर्मनीतील Rheinmetall AG या नामांकित शस्त्र उत्पादक कंपनीसोबत भागीदारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वाटाळ औद्योगिक वसाहतीत एक प्रचंड क्षमतेचा आर्टिलरी शेल्सचा प्लांट उभारला जाणार आहे. दरवर्षी २ लाख तोपगोळे, १०,००० टन स्फोटके आणि २,००० टन प्रोपेलंट्स येथे तयार होतील.
हा प्रकल्प भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना देणारा ठरतोय. संरक्षण क्षेत्रात भारतानं २०२९ पर्यंत ५०,००० कोटींची टार्गेट ठेवली असून या कराराचा त्यात मोठा वाटा असू शकतो.
कर्जमुक्तीची वाटचाल
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ८७% कर्ज फेडलं आहे. त्यांनी LIC, ICICI आणि युनियन बँकेसह अनेक वित्तसंस्थांची देणी परत केली आहेत. एकूण कर्ज ३८३१ कोटींवरून ४७५ कोटींवर आणण्यात यश आलंय. रिलायन्स पावरनेही कर्जमुक्त झाल्याचा दावा केला आहे.
तसंच, रिलायन्स कॅपिटल ही अंबाणींची आणखी एक संकटात सापडलेली कंपनी हिंदुजा ग्रुपने विकत घेतली आहे. ही एक मोठी दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
आणखी काही महत्वाचे प्रकल्प
१२ मे २०२५ रोजी रिलायन्स न्यू एनर्जीजने भारत सरकारच्या SJVN कंपनीकडून एक मोठा प्रकल्प मिळवला आहे — ज्यामध्ये ७०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी स्टोरेज सिस्टीम आणि ३५० मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे.
अंबाणी कुटुंबाचा सहभाग
अनिल अंबाणींचे दोन मुलगे, जय अनमोल आणि जय अंशुल, यांनी कंपनीच्या पुनरुत्थानात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे कर्ज फेडण्यात आणि प्रोजेक्ट मिळवण्यात मदत झाली आहे.
अजूनही अडथळे आहेत…
तरीही, सगळं आलबेल झालेलं नाही. रिलायन्स कम्युनिकेशन अजूनही ४०,००० कोटी रुपयांच्या कर्जात बुडाली आहे. ही कंपनी २जी घोटाळ्यापासून अजूनही सावरलेली नाही. त्यामुळे अनिल अंबाणी पूर्णपणे पुनरागमन करतील का, हे सांगणं कठीण आहे.
पण भूतान व जर्मन कंपन्यांशी झालेले करार, शेअर्समधील वाढ, आणि कंपन्यांचं पुन्हा नफ्यात येणं — या सगळ्या गोष्टी नक्कीच सकारात्मक संकेत आहेत.
तुमचं मत काय?
अनिल अंबाणी खरोखरच पुन्हा उदयास येतील का? त्यांचं कमबॅक हे तात्पुरतं आहे की दीर्घकाळ टिकणारं? खाली कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा!